‘मग थांबलात का? त्या राजकन्येचं हरण का नाही केलंत?’ ‘तिचं मी हरण केलं असतं, तर ती माझी स्वामिनी बनली असती; तिची ती योग्यताच नव्हती.’ ‘मी समजले नाही...’ ‘त्यात समजायचं काय अवघड आहे? द्रौपदी मला रूपसंपन्न भासली खरी; पण ती फक्त रूपसंपन्नच होती. पुरुषार्थापेक्षा कुलाचा आणि गुणापेक्षा रूपाचा जिला मोह आहे, त्या स्त्रीला माझ्या जीवनात जागा नाही. या घरची दासी म्हणूनसुद्धा तिची येण्याची पात्रता नव्हती. म्हणूनच तो संयम पाळावा लागला.’