‘मी तुझी मुळीच निराशा करणार नाही. ज्या कर्णानं प्रत्यक्ष शत्रूला सुद्धा कधी रिक्त हस्तानं माघारी जाऊ दिलं नाही, तो कर्ण आपल्या जन्मदात्रीला निराश कसा करील? माते, तू चिंता करू नकोस. तुझं इच्छित सफल होईल, माते! मी मातृ-ऋणाला बद्ध आहे पण मित्र-ऋणातही माझं पुरं जीवित गुंतवलंय् त्यासाठी मी तुझ्या पुत्रांशी युद्ध करीन. तुझे पुत्र वस्तुत: वधार्ह आहेत. मला त्यांचा संहार करणं शक्य आहे. अर्जुन हीच पांडवांची खरी शक्ती आहे. मी युद्ध त्याच्याशीच करीन. हे यशस्विनी, आम्हां दोघांपैकी कोणीही मृत्यू पावला, तरी तुझे पाच पुत्र शिल्लक राहतील, यापेक्षा दुसरं वचन मी तुला देऊ शकत नाही. ती अपेक्षाही तू करू नकोस.’