कर्णाच्या ओठांवर विलसणारे स्मित पाहून भीष्मांचा संताप वाढला. ‘राधेया, हा दासीपरिवार नाही. ही कौरवसभा आहे. इथं हा अहंकार चालणार नाही.’ कर्णाने मान तुकवली. भीष्म बोलत होते, ‘घोषयात्रेचं निमित्त तुम्ही पुढं केलंत, तेव्हाच मी विरोध केला होता; पण सम्राटांची आर्जवं करून तुम्ही संमती मिळवलीत. नको ते धाडस केलंत अन् स्वतःच्या फजितीला कारणीभूत झलात. एवढं होऊनही त्याची लाज तुम्हां कोणालाच वाटू नये, याचं आश्चर्य वाटतं.’ ‘आमच्या हातून असं कोणतं कर्म घडलं, की ज्याची लाज आम्ही बाळगावी, आपला संताप वाढावा? त्याचं कारण कळेल?’ भीष्म त्या प्रश्नाने अवाक् झाले.