वृषसेनाच्या मृत्यूने डोळ्यांत गोळा झालेले अश्रु त्या शब्दांच्या दाहात कुठच्या कुठे आटून गेले. त्याने संतापाने वळून पाहिले. त्या आरक्त विशाल नेत्रांत प्रज्वलित झालेली आग अर्जुनाला जाणवली. कर्णाने कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रथात अधोवदन बसून होता. तशा परिस्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर कटू हास्य प्रगटले. उभ्या धनुष्याला उजवा हात विसावून पराक्रमाच्या अहंकाराने उभ्या राहिलेल्या अर्जुनाला कर्ण म्हणाला, ‘अर्जुना, कृतार्थ तू नाहीस. आज कृतार्थ मी झालो. आज माझ्या मुलाचा वध करून तू सूड उगवला नाहीस, उलट, मला उपकारबद्ध केलंयस. त्याबद्दल तुझा मी ऋणी आहे. बालवयाचं कौतुक घरी करायचं- रणांगणावर पाठवण्याआधी. रणांगण
...more