‘युवराज, धृतराष्ट्रमहाराजांनी पांडवांना आमंत्रण देण्यास मला आज्ञा केलीय्.’ ‘ते मला माहीत आहे, काका! किंबहुना मीच तो आग्रह धरला. मी तातांना आवर्जून सांगितलं की, तुमच्याखेरीज दुसऱ्या कुणाला पाठवू नका.’ ‘असल्या गोष्टीत मला रस नाही.’ ‘का? रस नसायला काय झालं? पांडवांच्या राजसूयात तर तुमचा आनंदरस ओसंडत होता. इथंही यज्ञ होणार आहे. मयसभेऐवजी द्यूतगृह आहे.’ ‘हा तुमचा द्यूत आणि यज्ञ खरा असता, तर मी हर्षानं इंद्रप्रस्थाला गेलो असतो.’ ‘मग हा खरा यज्ञ नाही? ऐक, कर्णा, काका काय म्हणतात, ते!’ दुर्योधन हसला. विदुर म्हणाले, ‘दुर्योधना, माझं ऐक. हा द्यूत तू घडवू नकोस. निदान पांडवांना इथं आणण्याचं मला सांगू
...more