‘कर्णा! तू गेलास! या मित्राला सोडून! काय केलंस हे? मित्रा, तुझ्याविना हा दुर्योधन पोरका झाला, रे! अंगराजा, तुझ्या बळावर मी कुरुक्षेत्रावर रणांगण उभारलं. तूच मला विजयाची ग्वाही दिली होतीस ना? मग, मृत्युंजया, दिल्या वचनाची आठवण विसरून कुठं गेलास? तुझ्याविना मी पराजित झालो, रे! शत्रूच्या नावाच्या उच्चारानंदेखील तुझ्या अंगाचा दाह होत होता. मग आज तुझ्या पतनाचा विजयोत्सव साजरा करणारे पांडव तुला दिसत नाहीत का?’