हस्तमुद्रा! ज्या मोकळ्या हातांनी फाशांची दाने टाकली, ते हात सारे जिंकूनही मोकळेच राहिले. ज्या हातांनी द्यूतचा पट मांडला, तो द्यूत जिंकताच त्याच हातांनी तो पट उधळून दिला होता. आता द्यूतपट साधी लाकडी फळी बनली होती. फाशांना हस्तिदंती सोंगट्यांखेरीज काही अर्थ उरला नव्हता. पण याखेरीज फाशांना रूप लाभत नाही का? मानवी बुद्धीने रचलेला द्यूतत किती सहजपणे उधळला गेला! कोणत्या इच्छेने? ऐन वेळी कृष्ण कसा आला? कर्णाच्या चेहऱ्यावर एक खिन्न स्मित उमटले. ज्याला आईनं टाकलं, त्याला हे विधात्याचं भाकीत कळणार कसं?