ज्याचे यौवनपुष्प नुकतेच उमलू लागले होते, तो ययाति म्हाताऱ्यासारखा निष्क्रिय आणि नीरस झाला होता; आणि जिचे जीवनपुष्प कोमेजू लागले होते, ती त्याची आई एखाद्या तरुणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत मनःपूर्वक रस घेत होती, नव्या नव्या स्वप्नांत आणि संकल्पांत गढून जात होती. तिचे सुख बाबांवर सर्वस्वी अवलंबून आहे, ही माझी कल्पना किती निराधार होती!