अजूनही एखाद्या उदास क्षणी ती किंचाळू लागते : ‘तू आपल्या धर्माला जागली नाहीस, तू आपलं कर्तव्य जाणलं नाहीस. प्रेम काय बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं? प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे. वाटेत कितीही उंच डोंगर येवोत, त्यांना वळसा घालून ती पुढे वाहत जाते. ज्या दिवशी कुठलंही माणूस आपलं होतं, त्याच दिवशी त्याच्या गुणांचा नि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो. मागे राहते, ती केवळ निरपेक्ष प्रीती! अडखळत, ठेचाळत, धडपडत, पुनःपुन्हा पडत, पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती! परमेश्वराची पूजा करताना त्यानं आपल्याला काय दिलं आहे आणि का
...more