सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायकामुले, स्नेहीसोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा किंवा त्याला ज्या मूलभूत मर्यादा आहेत, त्या ओलांडण्याचा अधिकार नाही.