ऋषिमुनी अरण्यात जाऊन तपश्चर्या का करतात, हे या वनवासात मला कळले. निसर्ग आणि मनुष्य यांचे अनादी आणि अनंत असे निकटचे नाते आहे. हे दोघे जुळे भाऊच आहेत. म्हणूनच मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला, म्हणजे जीवन आपल्या सत्यस्वरूपात त्याच्यापुढे प्रगट होते. जीवनाची शक्ती कुठली आणि त्याच्या मर्यादा कुठल्या, हे माणसाला कळू लागते. निसर्गापासून मनुष्य दूर गेला, की त्याचे जीवन एकांगी होऊ लागते. त्या कृत्रिम, एकांगी जीवनात त्याच्या कल्पना, भावना, वासना या सर्वच गोष्टी अवास्तव किंवा विकृत स्वरूप धारण करतात.