मृत्यू! जीवनातले केवढे भयंकर रहस्य आहे हे! समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मूल वाळूचा किल्ला बांधते. भरतीची एक मोठी लाट येते आणि तो किल्ला कुठल्या कुठे नाहीसा होऊन जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा माणसाचे जीवन काय निराळे आहे? माधव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, परमेश्वराची इहलोकातली प्रतिमा म्हणून आपण ज्याच्या कर्तृत्वाची पूजा करतो, तो कोण आहे? विश्वाच्या विशाल वृक्षावरले एक चिमणे पान!