‘मग मानवी जीवनाचा हेतू काय?’ ‘या शापातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं. ययाति, इतर प्राण्यांना शारीरिक सुखदुःखांपलीकडची अनुभूती असत नाही. ती केवळ मनुष्याला मिळालेली देणगी आहे. या अनुभूतीच्या बळावरच मनुष्य पशुकोटीतून वर आला आहे. संस्कृतीच्या दुर्गम पर्वताची चढण तो चढत आहे. आज ना उद्या तो त्या गिरिशिखरावर जाईल. मग या सर्व शापांतून त्याचं जीवन मुक्त होईल. एक गोष्ट कधीही विसरू नकोस— शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही. तो निकष आहे आत्म्याचं समाधान!’