आजचा मनुष्य त्या जुन्या पोलादी चौकटीतून मुक्त झाला आहे. त्याच्या पायांतल्या निरर्थक रूढींच्या बेड्या गळून पडल्या आहेत. हे जे झाले, त्यात काही गैर आहे, असे नाही! हे होणे आवश्यक होते, अपरिहार्य होते, स्तंभातून प्रगट होणारा नरसिंह सामान्य मनुष्याला खोटा वाटू लागला, म्हणून हळहळण्याचे काही कारण नाही; पण त्या मनुष्याला अजून स्वतःच्या अंतःकरणातल्या देवाचा पत्ता लागला नाही, ही खरी दुःखाची गोष्ट आहे! आजचा मनुष्य मूर्तिभंजक झाला आहे, याचे मला वाईट वाटत नाही; पण समोर दिसेल ती मूर्ती फोडणे हाच आपला छंद आहे, अशी जी त्याची समजूत होऊ पाहत आहे— आणि भल्याभल्यांकडून तिची जी भलावणा केली जात आहे— ती मानवतेच्या
...more