शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो. पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही. ते काम अश्रूंनाच साधते. माझ्या गालांवर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले. आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी. माझे बालमन गडबडून गेले. तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घाशीत मी विचारले, ‘आई, काय झालं तुला?’