आईचे मन किती वेडे असते! त्याला वाटते, आपल्या बाळाने लवकर लवकर मोठे व्हावे, खूपखूप मोठे व्हावे. मोठेमोठे पराक्रम करावेत; विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे. पण त्याच वेळी त्याला वाटत असते, आपले बाळ सदैव लहान राहावे, आपल्या सावलीत ते सदैव सुरक्षित असावे, कळिकाळालासुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये!