श्रीकृष्णाला सखे अनेक, गुरू दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, पत्नी आठ, पुत्र ऐशी, कन्या चार; पण सख्या दोनच – पहिली राधा व दुसरी द्रौपदी. ‘राधा’ या जनमानसात पक्क्या रुजलेल्या व्यक्तिरेखेला भागवत, महाभारत, हरिवंशपुराण या श्रीकृष्णाशी निगडित अधिकृत संदर्भग्रंथांपैकी एकातही निसटताही संदर्भ नाही! उपस्थितांच्या एखाद्या दीर्घ यादीत तिचं नावसुद्धा नाही! काय करायचं राधेचं? असं आहे तर ही राधा श्रीकृष्णचरित्राला चिकटली तरी केव्हा? कशी? तर पंधराव्या शतकात ‘गीत गोविंद’ या शृंगाररसाला वाहून घेतलेल्या जयदेव कवीच्या अत्यंत जनप्रिय झालेल्या शृंगाररसप्रधान रसाळ खंडकाव्यातून श्रीकृष्णचरित्राला चिकटली.