मला आश्चर्य वाटे ते पितामह भीष्मांचं! ते पराक्रमी होते, वृद्ध होते, त्यांचा सर्वांवर वचक होता, सर्वांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. पांडवांविषयी मात्र ते फारच उदासीन वाटत! ते कधीही खांडववनाचं इंद्रप्रस्थात रूपांतर करणाऱ्या पांडवांना भेटायला गेले नाहीत! त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल कळवळून बोलले नाहीत! युवराज दुर्योधनांच्या पांडवद्वेषाला त्यांनी पुढाकार घेऊन स्वत: कधी आळा घातला नाही. राजमाता कुंतीदेवींना त्यांच्या या पडत्या काळातही त्यांनी मदतीचा हात दिला नाही. हे काहीतरीच घडत होतं. घडणारं सर्वच ते तटस्थपणे पाहत होते!