खरं आहे तुझं अश्वत्थामा, पण काही-काही लोकांकडे पाहिलं की, त्यांचं जीवन तू म्हणतोस त्याप्रमाणं दवबिंदूसारखं असेलसं वाटत नाही. ते कधीही सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात! त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात! जिवंतपणीच ते मृत झालेले असतात! त्यांना तू तुझ्या या कल्पनेत कुठं बसविणार? जीवनाला दवबिंदूची उपमा देऊन तू तुझी सौंदर्यदृष्टी व्यक्त केलीस, पण जीवन इतकं सहजसदृश्य नाही, सोपं नाही.’’ ‘‘नाही कर्णा, तू म्हणतास ते लोकसुद्धा दवबिंदूसारखेच असतात! केवळ हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात! त्यांच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत! त्यांना प्रकाश मिळालेला नसतो.
...more