एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं, पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं, तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो, तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की, दुर्गुण-सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत.