More on this book
Community
Kindle Notes & Highlights
सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!’
जगातील कोणत्याही दु:खाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते
कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं. संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं.
स्पर्धा ही नेहमीच माणसाला आंधळं करते.
कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते.
माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो. तेव्हाच धरती अनेक दाण्यांची टिचून भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार असतो.
श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावरतरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही.
तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन!
ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरुणात आभिमान नाही तो तरुण नाही.
जीवन म्हणजे विश्वाच्या भयाण भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे,
द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो! तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला, दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो.
वेड्या, जगाच्या मदतीवर आजपर्यंत कोणी जगलं आहे काय?
माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात, पण कधी-कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलावंच लागतं.
‘‘राजकारण म्हणजे काय, हे कर्णा, तुला कळतच नाही. तू तुझ्या कल्पनेप्रमाणं जगाकडे पाहायचा प्रयत्न करतोस, पण ते चूक आहे. राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं! ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! जग म्हणतं, भाषा हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे, पण राजकारणात हीच भाषा मनाच्या खऱ्या भावना अव्यक्त ठेवण्याचं साधन ठरतं! राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असावं. ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठं जातं, हे कुणालाच कळत नाही; तसंच राजकारणी माणसाच्या मनात काय-काय आहे, हे कुणाला कधीही कळता कामा नये. राजकारण म्हणजे खुल्या मनानं चर्चा करावी असा मंदिरातल्या प्रवचनाचा विषय नव्हेच!’’
जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे!’’
तरीही परंपरेचे केवळ शुष्क गोडवे गात बसू नकोस. तू लक्षात घे, तो केवळ वर्तमानकाळ!
एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं, पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं, तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो, तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की, दुर्गुण-सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत.
राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे!
आपल्या राज्यकारभारातील छिद्रं दुसऱ्याला दिसू देऊ नयेत, कारण कोणताही हितशत्रू नेमका अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो!
माणसानं नेहमीच कासवासारखं आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हाच जगाचा कानोसा घेण्यासाठी सावधपणानं आपली मान बाहेर काढावी!
काळ हा अखंड आहे आणि तोच सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव नि:पक्षपाती न्यायाधीश आहे,
पण सत्ता ही मदिरेसारखी असते. ती ज्याच्या हाती
असते त्याला धुंद करते आणि ज्यांच्या हाती ती नसते त्यांना ती वेडी करते!
अज्ञानाच्या जीवनरसावर मानवातील दोष पोसले जातात! मोठे होतात.’’
भरतीच्या सागरालासुद्धा उन्मत्तपणे उसळण्यासाठी मर्यादा असते!
ज्यांना धाडसाची स्वप्नं पाहायची सवय असते आणि जे आपलं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी झटतात तेच वीर असतात!’’
कुटिल कारस्थानांचं कपटी राजकारण हा कर्णाचा स्थायिभाव नव्हे,
ज्याला अन्यायाची अनुभूती असते तो कधीच कुणावरही अन्यायाचं अस्त्र उचलत नाही!
सूड, प्रतिशोध ही हलक्या मनाची क्षुद्र लक्तरं! फेकून दे ती! फेकून दे! ऊठ!’
वृद्धांचे अनुभवी बोल हे औषधी वनस्पतीसारखे असतात! मनाच्या विकृत कल्पनांच्या व्याधी ते निपटून टाकतात. द्वेष ही एक अशीच व्याधी आहे! या व्याधीच्या मृगजळामागं धापावताना देवादिकांची वैभवी राज्यंसुद्धा धुळीला मिळाली आहेत! आपसांतील भांडणं म्हणजे तर आपल्याच दातांखाली सापडलेली आपली जीभ! जे सुज्ञ आणि द्रष्टे असतात ते अशी जीभ कौशल्यानं दातांच्या कैचीतून सोडवून घेतात. त्यासाठी प्रेम आणि संयम यांची आवश्यकता असते, कारण द्वेषातून कपट, कपटातून क्रोध
आणि क्रोधातून युद्ध जन्म घेत असतं! युद्धांनी प्रश्न कधीच मिटत नसतात - उलट त्यांतून नवे जटिल प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच प्रेम आणि संयम हाच खरा धर्म आहे.
युवराजा, सर्व बऱ्यावाईट कल्पनांचा उगम मनातून होत असतो. एक वेळ सर्व जग जिंकणं सहज शक्य आहे, पण मन जिंकणं अत्यंत कठीण आहे! म्हणूनच खरा वीर असशील तर तुझ्या मनाचा - अर्जुन प्रथम जिंक!
माणूस एकवेळ सौख्याचे आणि आनंदाचे क्षण विसरू शकतो, पण दु:खाचे आणि विशेषत: अपमानाचे क्षण तर त्याला प्रयत्न करूनही कधीच विसरता येत नाहीत.
व्यक्ती, मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही! समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार! आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील, उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं? कुठल्याही व्यक्तीनं ते तसं कधीच मानू नये,
इंद्राला कवच-कुंडलं दान करण्यात कर्ण चुकला म्हणणाऱ्यांना काय कळणार की, या वेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर - तर मी वृषालीच्या भाली तसला मंगल तिलक लावण्याच्या भाग्याला मुकलो असतो.
‘‘पार्था, तो पहा सूर्य आणि तो पहा जयद्रथ!’’