तारुण्य! ज्वलंत धमन्यांचं आविरत स्पंदन! निसर्गानं मानवाला दिलेला सर्वांत श्रेष्ठ वर! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत! मनाच्या मयूराचा पूर्ण पसरलेला पिसारा! फुललेल्या शरीर-भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा! भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा! विश्वकर्त्याच्या आविरत धावणाऱ्या रथातील सर्वांत ऐटदार घोडा! माणसानं मानानं मिरवायचा काळ! काहीतरी मिळवायचा काळ! शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ! काहीतरी करावं, असं खऱ्या-खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येयवेडा काळ!