जावे त्यांच्या देशा
लेखक - पु. ल. देशपांडे
पुलंनी साहित्याच्या अनेक सुरेल सुरावटी जन्माला घातल्या पण त्यातही त्यांची प्रवासवर्णने अतिशय श्रवणीय.
पुलंच्या साहित्यातील या सुरावटी विशेष आवडीच्या. पुलंच्या लेखनाबद्दल काही बोलावं, एवढी माझी पात्रता नाही पण मला त्यांची प्रवासवर्णने जास्त भावतात. ही वर्णनं पुलंच्या खास शैलीतून उतरलेली असतात आणि या खुसखुशीत वर्णनाच्या साथीने ते ते ठिकाण जिवंत होऊन गेलेलं असतं. त्या त्या ठिकाणी त्यांना भेटलेली लोकं, घडलेले प्रसंग यांचं वर्णन वाचत वाचत त्या ठिकाणांना भेटी देत देत पुस्तक कधी वाचून संपून जातं हे ही समजत नाही. पुस्तक वाचताना पुलं जगाची सहल घडवून आणतात आणि ही सहल इतकी अफलातून असते की वाचताना वाटतं, या या ठिकाणी आपणही जायला हवं. मी तर बर्याचदा ती ठिकाणं इंटरनेटवर शोधून बघते, पुलंनी वर्णनच इतकं भन्नाट केलेलं असतं की वाचन करत असताना इंटरनेट तर इंटरनेट तिथून तरी ते ठिकाण बघण्याचा मोह मला आवरता येत नाही.
अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुलंची विशेष गाजलेली प्रवासवर्णने पण प्रवासवर्णन असूनही फारशी चर्चा न झालेलं पुस्तक म्हणजे हे, जावे त्यांच्या देशा. हे पुस्तक फारसं आवडलं नाही असं म्हणणारे वाचकही बघायला मिळतात. पण खरं सांगायचं तर हे पुस्तकही छान आहे.
छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये हे पुस्तक आपल्या समोर येतं. पुलंनी युरोप आणि अमेरिका सहल केली, तेथील काही भागांचं वर्णन यात आहे. पुलंनी युरोपच्या त्या त्या देशातील केलेलं कलेचं भरभरून कौतुक या पुस्तकात वाचायला मिळतं आणि त्याच वेळी आपल्या देशात कलेला कसा वाव मिळत नाही, याची हळहळ व्यक्त करताना ते वेळोवेळी विसरलेले नाहीत. कधी कधी या युरोपीय देशांचं एवढं एवढं कौतुक आणि आपल्या इथल्या परिस्थितीतील काढलेले दोष वाचायला मिळतात की देशप्रेमी मनाला कधी कधी ते आवडत नाही.
अमेरिकेच्या भेसूर जीवनाचं, संस्कार शून्य अशा मुलांच्या आयुष्याचं वर्णनही यात एका प्रकरणात आहे. त्याच वेळी अमेरिकेचाच एक भाग असणार्या सॅन फ्रान्सिस्कोवर जडलेलं पुलंचं अत्याधिक प्रेमही यात बघायला मिळतं.
हे पुस्तक वाचताना युरोपची छोटी सफर घडते, पाण्यावर नांदणाऱ्या व्हेनिसची जिथे भेट घडते तिथेच नेपल्सची निळी किमयाही पुलंच्या शैलीतून आपल्या भेटीस येते. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, संगीत, चित्र, शिल्प, स्थापत्य, नाट्य या कलांची युरोपातील गंगोत्री इटलीत असल्याने, या पुस्तकात इटली तर अधिक विस्ताराने दर्शन देते.
फ्लोरेंसला असताना पुलं या गंगोत्रीची अक्षरशः मानसपूजा करत असताना त्यांची एका अशा वृद्ध डॉक्टरशी भेट होते जो त्या फ्लोरेंसमध्ये राहून आद्य शंकराचार्य यांची पूजा करीत असतो. त्यांना आपला गुरू मानत असतो. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय इतिहास, भारतीय संतांची चरित्रे, वेद, उपनिषदे, गीता यांचा खूप मोठा अभ्यासक आणि पूजक असतो. पु.ल आणि या डॉक्टरची भेट हा या प्रकरणाचा परमोच्च बिंदू.
नेपल्सच्या प्रकरणात लेखिका डॉ. मीना प्रभु आणि त्यांचे यजमान श्री. सुधाकर प्रभु यांचाही उल्लेख आहे. हे दांपत्य पुलंच्या परिचयाचं.
हे पुस्तक आवर्जून वाचावं असंच... अपूर्वाई आणि पूर्वरंग डोक्यात ठेवून हे पुस्तक वाचलंत तर कदाचित निराशा होईल पण तरीही हे पुस्तक "जावे त्यांच्या देशा", त्या त्या देशांना भेट देण्यासाठी आणि तेथील कलेच्या वर्णनाने, ठिकाणांच्या वर्णनाने अचंबित होण्यासाठी किमान एकदा तरी जरूर वाचावे.
हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट मात्र राहून राहून वाटत होती की, पुलंनी विस्तृत प्रवासवर्णने मात्र कमी लिहिली. आख्खं जग पालथं घालणाऱ्या पुलंनी फक्त दोनच दीर्घ प्रवासवर्णने लिहावीत !
- मंजुषा जोगळेकर