विडंबन काव्य म्हणून प्रसिद्ध असलेलं अत्रेंचं हे पुस्तक मोठ्या आशेनं वाचायला घेतलं खरं, पण सुमारे ७७-७८ पानी प्रस्तावना पाहूनच पुस्तक वाचावेच की नाही असं झालं.. तरीही प्रस्तावनेची साधारण तीसेक पानं मी वाचली, आणि अखेर कंटाळून ती तशीच अर्धवट टाकून मूळ कविता वाचायला सुरूवात केली. सुरूवात तशी छान झाली, “कवी आणि चोर” मला आवडली. पण नंतरच्या कविता जरा जडंच गेल्या समजायला.. “श्यामले” त्यातल्या त्यात चांगली, पण थोडी चावट वाटली. “नवरसमंजरी” मधील ‘ वीररस, करूणारस, रूद्ररस’ एकदम छान वाटले👌🏼; तर ‘हास्यरस’ कळलाच नाही..😅 “कवी आणि कारकून” आवडली ; तर “मम बावाची ती आवा” काहीच कळली नाही..
यातील “आम्ही कोण” ही विडंबन कविता बहुतांश लोकांना माहित असेलंच.. मूळ कविता आणि ही विडंबन कविता शाळेच्या मराठीच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते…
खूप साऱ्या कविता छान वाटल्या, पण कदाचित मूळ कविता जास्त माहित नसल्याने असेल, वाचताना फारशी मजा आली नाही.. अगदी खळखळून हसूही नाही आले. पण शेवटी शेवटी राजकारणी लोकांचे ज्या पद्धतीने अगदी वाभाडे काढले आहेत, ते पाहून अत्रेंचे कौतुक वाटले. आत्ताच्या राजकारण्यांवर अशा पद्धतीने लिहिणे सोडा, बोलण्याचेही धारिष्ट्य सापडणे अवघड आहे, मग विडंबनाबद्दल तर न बोलणेच उत्तम!
असो, पुस्तक तसे चांगले आहे, पण कवितेची ज्यांना चांगली जाण आहे, आणि ज्यांना मूळ कविता माहित आहेत, त्यांना हे पुस्तक जास्त आवडणार, यात शंका नाही.
पण कवितांची साधारणच माहिती असणाऱ्यांनी खूप मनोरंजन होईल अशी अपेक्षा करू नये!😅