गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.
Gajānan Digambar Mādgulkar was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951 and Padma Shri in 1969.
................................................................................................ ................................................................................................ Bandhawarchya Babhali by G.D. Madgulkar ................................................................................................ ...............................................................................................
G. D. Madgulkar tells the story, and leaves the reader to draw conclusions, see implications, and more - his characters may comment, but he refrains, not even using them to do so for him. ................................................................................................ ................................................................................................
"बांधावरच्या बाभळी"
"आता परिस्थिती अशी आहे, की रामाला जमीन विकावयाची आहे. ती देशमुखांनाच मिळणार आहे. सुशिक्षित शेतकरी आणि गावचा नवा पुढारी म्हणून श्रीधर देशमुख मात्र गावातले सारे बांध तोडून सामाईक शेती करण्याच्या विचारात आहे. इंद्राबाई आणि देशमुख यांच्यामधील बांधावरच्या बाभळी जोराने वाढीला पडल्या आहेत. जगू त्या आठपंधरा दिवसांनी संवळत असतो. देशमुखांची मेंढरे हिरवा पाला खाऊन जोगावत असतात." ................................................................................................
"तांबडी आजी"
"“शरीरप्रकृती चांगली होती ग तिची!” "“चांगली नसायला काय झालं? ठेवणीची साडी पिढ्यान्पिढ्या टिकते.” "“म्हणजे?” “अरे, फार तरुणपणी नवरा गेला होता तिचा. भास्करबाबा म्हणून होता. फक्त तीन मुलं झाली. अप्पा, बापू आणि एक मुलगी मनुआत्या. मुलं लवकर व्हायची त्यांच्या काळात. नवरा गेला तेव्हा वीसेक वर्षांची असेल मथुकाकी. दिसायची फार सुरेख म्हणे तरुणपणात. तुझ्या आईच्या पाठराखणी आले होते मी. चांगली सालभर राहत होते तुमच्या गावात. तेव्हा पाहिलेली तिला. तेव्हा ती चाळिशीला आली होती. पण साऱ्या गावात बाई नव्हती दाखवायला तिच्यासारखी. दुधाण्यावरल्या बोक्यासारखी दिसत होती गुबगुबीत.”"
"मारुतीच्या देवळात कुणी सत्पुरुष उतरले होते. ते नित्य नियमाने ‘ज्ञानेश्वरी’वर निरुपण करीत. एकदा एका ओवीवर ते अडले. त्याचा त्यांनाच अर्थ विशद करून सांगता येईना. तांबडी आजी पुढे झाली. देवळापुढचे सारे पटांगण माणसांनी फुललेले होते. म्हातारीने त्या सार्यांना थक्क करून टाकले. त्या ओवीचा अर्थ इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितला तिने की, त्या सत्पुरुषाने ‘माउली’ म्हणून सर्वांसमक्ष तिला दंडवत घातला...
"एके साली गावात अवर्षण झाले. जमिनीला भेगा पडल्या. ओढे-विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या. घराघरांतल्या आडांना मोकळ्या पेवांची कळा आली. चाऱ्यावाचून गुरेढोरे तडफडून मरायला लागली. माणसे चिंचेचा पाला ओरबाडून खाऊ लागली. तांबड्या आजीने माळावरचा महादेव पाण्यात बुडवला. तीन दिवस तीन रात्री एकटीने पारोळतळ्याचे पाणी देवाच्या गाभाऱ्यात नेऊन ओतले. शिवालयाचे दगडी गर्भागार एखादा हंडा भरावा तसे भरले. शिवाची पिंडी बुडली मात्र, आभाळात मेघ दाटले आणि अमृताच्या चुळा टाकीत वरुणराजा आला. त्या साली गावच्या जिराईत शिवाराने मंगळवेढ्याच्या मुस्कटात मारली..." ................................................................................................
"द़ृष्टी"
"आधी गाव निपाण्या. पाऊस पडला तरच कोंब भुईतून वर निघायचा. त्यांत ज्ञानूचा बिवा निव्वळ माळवट. बाजरी कडधानावाचून त्यात जित्राप उभे राहायचे नाही. बाकीच्याचे बी माळच गिळून टाकायचा.
"जिवाच्या कराराने तो कामास लागला. रात्रंदिवस खूप लागला. त्या तसल्या माळवटात त्याने विहीर धरली. एकहाती खांदत करून सालाभरात त्याने शेषाच्या टाळूवर नेऊन कुदळ भिडवली. पाणी लागले. माळमोटेला तरी पैका कुठला? विहीर त्याने पाडली. मोटेचे कामही स्वत:च करू लागला. आपल्या बिघ्याच्या कडेला त्याने कागदी लिंबाची रोपे लावली. खांद्यावरून माठ वाहून त्यांच्या बुडी पाणी घातले. रोपाची झाडे झाली. त्यांना फळे येऊ लागली. त्या फळांनी गावातली मोड ज्ञानूच्या हातांत आणली. तीनचार सालांत मालकीची माळमोट करण्याइतकी माया त्याने साठवली. ... "
"सहासात वर्षे गेली आणि ज्योतिबाच्या माळावर एक टुमदार बागाईत लखलखू लागले. ज्ञानूच्या बिघा दृष्ट लागावी असा पिकू लागला. संत्र्यामोसंब्यांची तिथल्या मानाने दुर्मीळ झाडे, गावगौरींनी पंचमीचा फेर धरावा तशी त्या बिघ्यात आंदोळू लागली. जोंधळा, गहू, हरभरा, माळवी, नाना तर्हेची पिके ज्ञानू त्या भुईतून काढू लागला. या दीर्घ काळात तो कधी गावात आला नाही, देवळाच्या पायरीवरील गावगप्पांत सामील झाला नाही, की शिवेशेजारच्या पिराचा उरूस त्याने पाहिला नाही. बारा महिने, अठरा काळ तो जणू मातीशी खेळत राहिला. सूर्य-चंद्रांना न्याहाळू शकणारी दृष्टी त्याने एका कल्पित खिडकीशी डांबून ठेवली. त्या खिडकीतून दिसायचा त्याचा बिघा, त्याची शेती." ................................................................................................
"कहाणी गट्टसोड्यांची"
"बीज गेली. तीज गेली. नागपंचमी नाचत आली. तरण्या पोरी फेर नाचल्या. पोरींसारख्या सरी नाचल्या. दिवसापाठीमागे दिवस जात राहिले. भिम्या काही आला नाही. तीन सोमवार आले गेले. तीनदा वाड्यात कीर्तन झाले. टाळमृदुंग घुमत राहिले. भिम्याची वाट बघत राहिले. कुणी देखील आले नाही. कृष्णजन्माची अष्टमी आली. टोलेजंग उत्सव झाला. रात्री भर बारा वाजता, गावाने सुंठवडा खाल्ला. गोपाळ-कृष्णाचा जयजयकार केला. भिम्या गट्टसोडी आला नाही. सारा गाव जागा होता. कोपऱ्याकोपऱ्यात माणसे होती. वाड्याच्या आसपास फिरेल कोण? हत्यार्यांचीही हिंमत नव्हती. अवसेचा दिवस उजाडला. राजा मनात आनंदला. त्याला वाटलं जिंकली आपण. आता भिम्या येत नाही. परभारा तो नरकात जाणार." ................................................................................................
"चालणारी गोष्ट"
"त्या रात्री मला झोप कशी ती लागलीच नाही. मधून मधून डुलकी लागत होती. माझा मीच दचकून जागा होत होतो. हातापायांच्या हालचाली थांबत होत्या; पण मस्तकातील चक्र फिरतेच राहत होते. माझे वागणे बरोबर झाले होते की ते पूर्णतया चुकले होते हे माझे मलाच उमगत नव्हते. नाही म्हटले तरी, त्या कामाचे पंधरावीस सहस्र रुपये मिळाले असते. एवढी मोठी रक्कम मी हरवून बसलो होतो. नसत्या अभिमानाच्या आहारी गेल्याने, माझी मी हानी करून घेतली होती. त्या दाक्षिणात्य निर्मात्याला, त्याच्या चित्रपटासाठी, चालणारी गोष्ट हवी होती. त्या चालणाऱ्या गोष्टीची चक्रे त्याने सिद्ध ठेवलेली होती. रथाचा सांगाडा तेवढा मी जोडून द्यायचा होता. माझा सांगाडा त्याला मान्य होता; पण तो सांगाडा त्या जुनाट चाकांशी जोडून देण्याची माझी सिद्धता नव्हती. ती चाके वेगळ्या पद्धतीची होती. माझा सांगाडा वेगळ्या जातीचा होता. माझ्या सांगाड्याला साजेशी चक्रे मीच निर्माण करून देईन, हा माझा हट्ट होता. गोेष्ट चालायची असेल तर तिला तीच चक्रे लावली पाहिजेत, असा त्याचा ठाम निश्चय होता. प्रथम प्रथम मऊपणाने चाललेली त्याची -माझी बोलाचाली शेवटी अगदी वातड झाली. कधी त्याच्या बाजूने ताण बसला, कधी माझ्या बाजूने ओढ घेतली. बोलणे फार ताणले गेले. शेवटी तुटले. तो बापडा आला तसा निघून गेला. माझ्या मनाचे उजू-तवाजू एकसारखे होत राहिले. एक गोष्ट, व्यवसाय म्हणून पत्करल्यावर तिची देवाणघेवाण आत्मलाभावर दृष्टी ठेवून केली पाहिजे, असे एकामनी मला वाटत होते, एकामनी विचार येत होते की धनलाभासाठी काय काय म्हणून सोडायचे! विसंगत दिसणाऱ्या वस्तूंची एकसंधता मुकाट्याने का मान्य करायची? तेल व पाणी अगदी एकरूप झाले असल्याचा निर्वाळा कशासाठी द्यायचा? किंमत येते आहे म्हणून काय काय विकायचे?
"अनेकदा विचार करूनही त्या निर्मात्यांचे म्हणणे मला पटले नव्हते. माझ्यातल्या लेखकाची सरशी झाली होती. प्रापंचिक आसामी हरला होता. त्या दोघांची बाचाबाची माझ्या अंतर्मनात अखंड होत राहिली. पापणीला पापण�� पुन: पुन्हा लागली; पण झोप कांही उपजली नाही. उपजली तरी राहिली नाही. आलोचन जाग्रण घडले."
"चिडलेल्या थकव्याने पापण्यांचे पडदे दूर सारले. को��ळा उजेड डोळ्यांवर शिंपडला गेला. सकाळ झाली असल्याचे जाणवले. मी नेटाने उठलो. चूळ भरून येऊन बाहेरच्या व्हरांड्यात आलो. सकाळ कशी प्रसन्न वाटली. निसर्गाच्या राज्यात कसलीच तडजोड नव्हती. शरदातील प्रभात, शरदातल्या प्रभातीसारखीच होती. धुक्याचा पडदा हळूहळू हटत होता. सोनमुखी सकाळ प्रकाशाचे संगीत आळवीत होती. तिचा स्वर अचूक लागला होता. प्रसन्नपणाने बहरलेल्या वेलींवर विविधरंगी फुले आंदोळत होती. त्यांचा सुगंध सभोवार दरवळत होता. प्रकाशाच्या स्वर-लहरींवर एखादे पाखरू चमकत होते. जणू तेवढाच प्रकाशस्वर वर चढून, उतरत होता.
"त्या सुंदर वातावरणाच्या दर्शनाने माझ्या डोळ्यांत साचलेला कडवट ताठरपणा शितळला. माझ्या नेहमीच्या खुर्चीत बसून मी समोर पाहू लागलो. समोर दिसणाऱ्या साऱ्याच दृश्याला एक मुलायम एकसंधता होती. काही सौंदर्याकृती स्थिर होत्या, काही हलत होत्या. हलत्यांच्या हलण्याने स्थिरांचा गोडवा वाढत होता. स्थिरांच्या थिराव्याने हलत्यांच्या हालचालीचे सौंदर्य खुलत होते. दिसणाऱ्या रंगांना असीम विविधता होती; पण त्या विविधतेलाही संगती होती. सारे काही असावे तसेच होते. जिथे असावे तिथेच होते." .................................................................................................
"नटनट"
" ... चौलच्या गावकर्यांना सदा ‘प्रतिगंधर्व’ झाला आहे, इतकेच ऐकले होते. त्याला प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहण्याचा योग, कोणाही चौलकराच्या आयुष्यात आला नव्हता. त्यांच्यापैकी पुष्कळांनी सदा लहान असताना त्याला पाहिलेले होते. या ज्ञानाचे भांडवल करून, ते आजवर सदाविषयीच्या बाता ठोकीत आले होते. त्याच्याविषयी अभिमानाने बोलत आले होते.
"सदा जोश्याला या गोष्टीची जाण मुळीच नव्हती. पनवेलहून येणाऱ्या मोटारने तो गावात आला होता. आपल्या गर्भारशी बायकोला सांभाळून चालवीत, हिंगुळदेवीच्या पायथ्याशी पोहोचला होता. तिथे त्याच्या काकाची एक छोटीशी वाडी होती. पाचपन्नास नारळाची झाडे होती, पाचपन्नास सुपारीची होती. एक लहानसे घरटे होते. काका जन्मभर मोकळाच राहिला होता. पत्ता शोधून शोधून, त्याने अनेकवार आपल्या एकुलत्या एका पुतण्याला लिहिले होते की, एकदा गावाकडे येऊन जा. मी आता फार दिवस जगणार नाही. सदाने त्या पत्रांना कधीच उत्तरे धाडली नव्हती. आता तो काकाही मरून जुनापुराणा झाला होता. त्याच्या रिकाम्या वास्तूत सदाचे पाऊल आज पडले होते. तो सहकुटुंब तिथे येऊन पोहोचला होता. अवघडलेल्या अंगाची उमा आणि तिच्यावर वेडी माया करणारा सदा, या दोघांनी मिळून काकाच्या घरट्यापुढचा सारा पालापाचोळा काढून टाकला. घरटे झाडूनपुसून लख्ख केले. कोळ्यांची जाळी आणि कातणीची घरे औषधाला उरू दिली नाहीत. सांदीला पडलेली भांडीकुंडी त्या दोघांनी शोधून काढली. घासूनपुसून चक्क केली. त्या उदास घरकुलाची कळा त्यांनी पार पालटून टाकली. सैंपाकघर लागले. सामानसुमानाची मांडामांड ठाकठीक झाली. उमा काही रांधू लागली आणि सदा बाहेरच्या ओटीवर एक चटई टाकून बसला. अडगळीतला जुनाट फाणस त्याने शोधून काढला होता. तो दिवा परत जळता व्हावा, अशा खटपटीला तो लागला.
"सूर्य मावळून गेला होता. जगाआधीच अवघी वाडी अंधाराने झाकोळली होती. झावळ्या निश्चल होत्या. त्या एकलकोंड्या वाडीत अवेळीच रातकिड्यांची सुरावट सुरू झाली होती. सदूला त्या एकांताचेच सुख वाटत होते.
"बरीच खटपट केल्यानंतर, तो फाणस ठीक झाला. सारा सांगाडा जिथल्यातिथे झाल्याचे स्वत: सदूला पटले. घासलेटवात त्याने अवशीच आणली होती. तो म्हातारा फाणस जागा झाला. शांतपणे जळू लागला. सदूला वाटले, काका असते तर, त्यांचा चेहरा असाच उजळून आला असता. ओटीच्या छपराला आधारभूत झालेला एक कणखर वासा बघून, सदूने तो कंदील काथ्याच्या चरीशी गुंतवून त्याला टांगला. दिव्याखाली सावली पडली. अवतीभवती उजेड झाला. तो परत चटईवर स्वस्थ बसला. थकलेली पाठ त्याने भिंतीला टेकली."
"दुर्दैवानं त्या वाडीतला निवास त्यांना पचला नाही. त्या खरेदीदार गुजराथ्याचा माणूस दुसऱ्याच दिवशी कोकलत आला. मरणापूर्वी, सदाच्या काकांनी ती वाडी खरोखरच अगदी कवडीमोलानं विकून टाकलेली होती.
"“आता पुढे काय?” हा प्रश्न त्या नवदांपत्यासमोर ‘आ’ वासून उभा राहिला. काल भेटून गेलेले मंडळ परत त्याच्या मदतीला धावले. गावाची इभ्रत उभ्या महाराष्ट्रात वाढविणाऱ्या सदासारख्या कलावंताची कदर, गावच्या प्रमुखांनी करायची नाही तर करायची कुणी? सदा आणि उमा यांनी चार-सहा दिवसच कसेबसे त्या वडिलोपार्जित वाडीत काढले आणि त्या जागेचा निरोप घेतला. बाळपणापासून ‘आसरा, आधार’ झालेला नाटकधंदा सोडताना सदाचे डोळे पाणावले नाहीत, पण... पण ती वाडी सोडताना मात्र त्याच्या डोळ्यांना कोरडे राहणे जमले नाही. उमा तर बिचारी फार रडली.
"चौलच्या शेजारी, टेकडीवर उंच ठिकाणी एक दत्तात्रेयाचे मंदिर आहे. त्या दत्ताचा पुजारी म्हणून गावकर्यांनी सदाची योजना केली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही वरच केली. ऐन वयात, ते तरुण जोडपे जनवस्तीपासून दूर झाले. ‘काखे झोळी, पुढे श्वान’ अशा अवताराच्या सान्निध्यात, जणू वानप्रस्थाश्रमात दाखल झाले. पोटापुरता पगार देवस्थानाने देऊ केला. राहण्याला जागा आयती मिळाली. एखाद्या आश्रमवासी मुनीसारखा सदाचा गृहस्थाश्रम सुरू झाला." ................................................................................................
"पुरषाची आई"
"“आई, तुमच्या मुलाचं लग्न झाल्यावर मैनानं काय करावं?”
"“त्याचं प्रेम विसरून जावं. पुन: पहिल्यासारखं जगावं. ती श्रीमंत आहे. रोज नवा मित्र मिळेल तिला-”
"“छान, तुम्हांला तुमच्या मुलाचं आयुष्य रुळावर यायला हवं. मैना मेली तरी चालेल-”
"म्हातारी ताडकन उभी राहिली. तिचे सर्वांग ताठ झाले. तिने एक नि:श्वास जोराने सोडला आणि मग आवेगानं ती बोलली-
"“मी मैनाची आई नव्हे; पुरषाची आई आहे.”" ................................................................................................
"सजा"
"निळू वाघ्यानं त्या लंगराला हात घातला. तो साखळदंड वाघ्याच्या हिसक्याने तुटला तर, गावावर खंडोबाची कृपा आहे म्हणायचे. नाही तुटला, तर देवाला कौल लावायचा. त्याची भाकणूक करीत रात्र जागवायची. हा कैक पिढ्यांचा रिवाज होता." ................................................................................................
"पांढरीचा भेंडा"
" ... बापडा लागोपाठ किती दिवस उन्हातान्हात भटकत होता कोण जाणे. भर दुपारच्या झोपेने आज त्याच्या शरीराला सुख दिसले. उठून बसताक्षणीच त्याला जाणवले, आज आपण आपल्या स्वत:च्या गावी आहोत. साऱ्या गावाचे पुढारीपण करणाऱ्या पाटलाच्या ढेलजेवर आहोत. गावच्या काळीत पिकलेल्या धान्याची भाकर आज आपल्या पोटात गेली आहे. बुडाखालची धरती आपली आहे. माथ्यावरचे छप्पर आपल्या गावकऱ्याच्या मालकीचे आहे. जन्मात पहिल्यांदाच तो आपल्या जन्म गावी आला होता. आईचा स्पर्श लेकराला जाणवतो, तसाच गावच्या धरणीचा स्पर्श त्याला जाणवत होता. डोळ्यांपुढचा अंधार सरला नव्हता; पण उद्याचे स्वप्न पाहण्याची शक्ती डोळ्याकाळजाला आपसूकपणे आली होती. पाटलांच्या वाड्यात असल्याने आपण सुरक्षित आहोत हे त्याला उमगले होते. पाटीलवाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहून, आपण आपल्या जन्मगावचे दर्शन घेतले, तर उंडग्या पोरांचा दगड आता आपल्या पाठीत बसणार नाही; हेही त्याने ओळखले होते. ... " ................................................................................................
"औषधी"
"पहिल्यापासूनच तो तसा छंदी असता तर हरकत नव्हती; पण तो माणूस अगदी सरळ होता. अतिशय हळव्या मनाचा होता. पापभीरू होता. दिवसभर अंग मोडून काम करावं. सायंकाळी मित्रमंडळीत येऊन मनमुराद खेळावं. दिवे- लागण झाली की आपल्या घरकुलाकडं वळावं, असाच त्याचा परिपाठ होता. अगदी परवा परवापर्यंत तो इतका शहाण्यासारखा वागत होता.
"त्या नटमोगरीची आणि त्याची ओळख कशी झाली आणि तिच्या रेशमी पाशात तो इतका आपादमस्तक कसा काय गवसला, त्याचे त्याला माहीत. शरीरपोषणाला आवश्यक असे एखादे अन्नसत्त्व कमी पडले म्हणजे लहान मूल माती खायला शिकते. श्यामरावाच्या बालसुलभ मनाला असे काय कमी पडले होते कोण जाणे. त्याचे घर खरोखर सुखी होते. लष्करात चाकरी केलेले त्याचे वडील वयाची सत्तरी उलटली तरी अजून उभे होते. संसाराची धुरा पेलीत होते. बायको तर लाखांत एक म्हणावी इतकी सज्जन होती. त्या बिचारीच्या मुद्रेवरले हसू फिकटल्याचे देखील आजवर कुणी पाहिले नव्हते. गृहकृत्यांत तर ती दक्ष होतीच; पण आला गेला, पाहुणा-रावळा सर्वांचा यथोचित सत्कार करण्यातही ती तरबेज होती. आपला नवरा अगदी देवदूत आहे, अशी त्या बापडीची गाढ श्रद्धा होती. वागण्याइतकीच दिसायलाही ती देखणी होती. अस्सल मराठा घराण्यातील कर्त्या बायकांना जो एक नेटका देखणेपणा असतो, तो शिर्के वहिनींच्या ठायी पुरेपूर होता. पांढऱ्या शुभ्र साडीचा जरतारी पदर डोक्यावरून घेऊन, त्या चालू लागल्या की पाहणाऱ्यास वाटे; कुणा भाग्यवंताची लक्ष्मीच चालते आहे. पस्तिशीच्या वयातही त्यांच्या अंगाला थुलथुलीतपणा शिवलेलाच नव्हता. त्यांची अंगकाठी गोरगोमटी, शेलाटी अशी जशीच्या तशी उरलेली होती.
"शिर्के दंपतीला दोनतीनच अपत्ये होती. तीही अति चांगली. शिक्षणात हुषार-वागण्यात नम्र, दिसण्यात गोजिरवाणी. इतके असूनही श्यामरावाचा पाय चळला होता. त्याची वाटच उलटी फिरली होती. तो सर्वनाशाच्या रस्त्याने भरधाव धावू लागला होता.
"त्या नगरभवानीच्या तडाख्यातून त्याला सोडविणे कठीण होते. फार अवघड होते. ती दिसायला सुंदर होती. फार प्रख्यात अशी गायिका होती. तिचा वागण्याबोलण्याचा ढंग मोठा खानदानी होता; पण ते सारे सोंग होते. तिच्या प्रियकरांची संख्या साऱ्या शहरात माहीत होती. त्या मेळाव्यात मोठमोठ्या सरकारी अंमलदारापासून, तिच्या स्वत:च्या ड्रायव्हरपर्यंत, सर्व जातीचे आणि सर्व वयाचे लोक होते." ................................................................................................
"ताल"
"“चिंतामणी आगाशानं आत्महत्या केली. कळलं का तुम्हांला?” कुणा तरी अनोळखी पुणेकराने ही भयंकर बातमी मला आवर्जून सांगितली. कशी केली, का केली? वगैरे प्रश्न मला सुचलेच नाहीत. मी अगदी सुन्न झालो. ती बातमी देणारा माणूस निघून गेला. मी त्याला ‘बसा’देखील म्हणालो नाही. डेक्कन क्वीन नेहमीच्या वेगवान गतीने धावत होती. डब्यातील बाकीचे प्रवासी आपापल्या विषयांवर बोलत होते. चहा-सिगारेट विकणारे पोर्ये हातावरची तबके तोलीत, गर्दींतून वाट काढीत होते. उघड्या खिडक्यांच्या बाहेर, खंडाळ्याच्या आसपासचा रम्य वनप्रदेश उलट्या गतीने धावत होता. मी मात्र सुन्न झालो होतो." ................................................................................................
"काशीयात्रा"
"“माझ्या दैवी काशी नाही, गंगा नाही. मी पापिणी आहे. काशीच्या वाटेवर पाप पाहिले. दिगंबर... दिगंबर... आणि प्रयागा...!”" ................................................................................................
"काळजी"
"पानशेत धरण फुटले. खडकवासल्याच्या भिंतीला भगदाड पडले आणि पुण्यात अनर्थ उडाला. नेहमी झुळझुळत जाणारी कृशांगी मुठा, त्या दिवशी एखाद्या लावेसारखी उन्मत्त झाली. ऐन काठावर असलेली शास्त्रीबुवांची ती मंदिरे, मातलेत्या पाण्याने घशात घेतली. शास्त्रीबुवा आणि त्यांची कुटुंबीय मंडळी, देवळाच्या शिखरावर बारा घंटे निराधार अवस्थेत उभी राहिली. मंदिराच्या पाठीमागेच असलेल्या त्यांच्या राहत्या घरावरील छप्पर तरंगत जाताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. घराचे अस्तित्व कणाकणाने विरघळून गेलेले त्यांना दिसले. मूल्यवान ग्रंथांचे पेटारे जलार्पण झाले. अत्यंत निष्ठेने अक्षरबद्ध केलेली संशोधने जलराक्षस घेऊन गेला. पुन: लिहिणे साधणार नाही, असे असंख्य हस्तलिखित कागद, पोरांनी सोडलेल्या कागदी होड्यांच्या मोलाने, पुराच्या पाण्यात वाहवटून गेले." ................................................................................................ ...............................................................................................