श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
तशी श्री.ना.पेंडसे ह्यांच्याशी ओळख फारच उशिरा झाली, किंवा माहित नाही ह्या आधी झाली असती तरी हा काळाच्या फार पुढचा लेखक मला कितपत समजला अथवा उमजला असता. मराठीत काही लेखकांच्या नशिबी अमाप प्रसिद्धी आली आहे पण श्री.नांची एवढी प्रसिद्धी किंवा तोंड फाटे पर्यंत स्तुती हे निदान माझ्या ऐकिवात नाही. असो.
ह्या कादंबरीचा आवाका, पैस, कालखंड खूप भव्य आहे. थेट पानिपताच्या युध्दाचा शेवट झाल्यापासून कादंबरी सुरू होते ती संपते भारत स्वतंत्र झाल्यानंतर. ह्या अवाक्याची कादंबरी मराठीत नसावीच.
भले गोष्ट एका काल्पनिक घराण्याची असो, पण श्री. नांची पात्र अत्यंत खरीखुरी. त्यांनी ज्या पद्धतीने पात्र उभी केली आहेत त्यावरून त्यांचं माणूस ह्या विषयाचं किती निरीक्षण आणि सखोल अभ्यास असावा हे कळून येतं. प्रत्यक्षात पाहिलेल्या अथवा ओळखीच्या लोकांचं व्यक्ती चित्रण ठीकच पण कल्पनेत ही एवढी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह उभी करणं हे अवघड काम आहे. श्री नांनी एका कादंबरीत अनेक व्यक्तीचित्र लिहिली आहेत. एकेक व्यक्तिमत्व एवढं चित्तवेधक, दादा खोत, नाना खोत, मधू खोत, नरसू खोत, बजापा, चिमापा, ताई, गोदा, गणेशशास्त्री तुंबाडकर, श्रीमती, ओड्डल, विश्राम, विनू आचारी, संताजी, तारी, नरू शेठ, अप्पा पडवळ, खान वकील आणि जुलाली. ही झाली मुख्य पात्र पण अगदी छोट्या तल्या छोट्या व्यक्तिरेखा पण एवढ्या बारीक सारीक तपशिलासह उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही. गोदा, नरसू खोत, विश्राम आणि ताई ही व्यक्तिमत्व मात्र पर्वताएवढी, नतमस्तक व्हावे एवढी.
कादंबरीची भाषा हा एक अभ्यासाचा विषय आहे. स्पष्ट, सडेतोड, भेदक, शीवराळ कधी अर्वाच्य. पण जसं पात्र तशी भाषा. उगाच सोवळेपणाचा सोस किंवा आव नाही. देहाडराय मास्तर बोलायला लागले की तर वाचतानाही भंबेरी उडावी.
बरं कादंबरी फक्त एका घराण्यापुरती नाही. दुसरा खंड तर हीच पात्र घेऊन त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपल्याला घेऊन जातो. कादंबरी एका घराण्याची राहताच नाही, ती राजकीय होते. टिळक, सावरकर आणि गांधी यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाते. जाता जाता, फाळणी, त्यावेळची राजकीय परिस्थिती ह्यावर वेग वेगळ्या दृष्टिकोनातून जळजळीत भाष्य करून जाते.
ह्या कादंबरीबद्दल बोलावं तितकं कमीच, कमालीची गुंतागुंत, एवढी पात्र, एवढे संदर्भ तरी ही कादंबरी एकदम गोळीबंद अगदी घट्ट विणलेली आहे आणि कमालीची वेगवान. जवळ जवळ १५०० पानांचा ऐवज पण एकदा सुरुवात केली की हातातून ठेवणं अशक्य.
कादंबरी घराण्या बद्दल म्हणावी, राजकीय म्हणावी का काय? कारण ती ह्या बद्दल तर आहेच, पण नरसु, गोदा, ताई, विश्राम सहज आपल्याला जगण्याचं तत्त्वज्ञान पण देऊन जातात. मग काय म्हणावं अशा कादंबरीला? कुठल्या साच्यात बसवणं म्हणजे तिचा अपमान आहे. बसवूच नये. ती आहे. घ्या आणि वाचा, प्रत्येकाला काहीतरी वेगळं आणि नवीन सापडेल त्याच्या पुरती ती तशी असेल. कदाचित अजून काही वर्षांनी मी हातात घेतली तर मला सुद्धा काही नवीनच गवसेल.
वाचावी अशी, जगावी अशी, तुंबाडमय होऊन जावी अशी. मी जवळ जवळ दोन महिने पूर्ण तुंबाडमय होतो. आता संपली आहे पण हुरहूर आणि रुखरुख मागे ठेवून.
खरंतर या कादंबरीबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच असेल. ही कादंबरी वाचण्याआधी मनात अनेक शंका होत्या. एका घरण्याबद्दल असं काय लिहिलंय की कादंबरीचे दोन मोठे खंड व्हावेत, कोण कुठले खोत, त्यांच्याशी आपला काय संबंध! पण मनातील शंका बाजूला ठेवून पहिला खंड हातात घेतला आणि तुंबाडच्या अद्भुड जगात हारावत गेलो. पहिला खंड संपताच दुसरा वाचायला सुरुवात केली. अजूनही मनात शंका होतीच 'दुसऱ्या खंडात अजून काय वेगळं असेल' पण खरं सांगायचं तर दुसऱ्या खंडाने मला जास्त खिळवून ठेवलं. यातील काही पत्रांबद्दल अतिशय चीड येत होती तर काहींबद्दल सहानुभूती. एक मात्र मानावच लागेल, ही कादंबरी वाचताना तिच्यातल्या प्रत्येक पात्राबद्दल एक वेगळंच कुतूहल वाटत होतं. ही सर्व पात्रे जणू खरीच असल्याप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष भेटायची तीव्र इच्छा होत होती. हा वाचनानुभव खरच अतिशय आनंददायी व समाधानकारक होता. असा अनुभव देणाऱ्या उत्तमोत्तम साहित्य कृतींची निर्मित आपल्या माय मराठीत भविष्यातही होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ह्या कादंबरीत काय नाही... एक छोट्या गावाच्या घराण्यापासून सुरू होणारा प्रवास थेट भारताच्या स्वातंत्रापर्यंत येऊन थक्क करतो. राजकीय पार्श्वभूमी वर बेतलेली माझा वाचनात आलेली सगळ्यात मस्त कादंबरी. याची सुरुवात एक काल्पनिक गाव 'तुंबाड' मधील खोत घरांच्या पासून होते. पण यात फक्त एकच एक विषय नाही. आधी विषय घरापासून सुरू होतो नंतर तो सामाजिक होत होत राजकारण या विषयापर्यंत पोचतो. लेखक श्री. ना. पेंडसे यांनी उभे केलेले काही पात्र जे कायम स्मरणात राहतील- गोदा , गणेशशास्त्री, नरसु खोत, बजापा तुंबाडकर आणि जुलाली , चिमापा तुंबाडकर, ओडल, आणि इतरही बाकीचे. मला आवडलेला आणि लेखकाने सिद्धहस्ते मांडलेला भाग म्हणजे टिळक गांधी सावरकर आणि काँग्रेस यावरील मत.
जगबुडी नदीच्या काठी वसलेल्या तुंबाड गावातील खोताच्या चार पिढ्याची कथा म्हणजे ही मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती..
श्री ना पेंडसे यांच्या ताकदवान लेखणीने पहिल्या पानापासून तुंबाड हे गाव, खोतांचा वाडा, हरण टेंभा, टेंभुर्णी, मोरया ची पावले, जगबुडी वरील धक्का वाचकांसमोर जिवंत केला आहे. पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता भारतात सुरू होण्याच्या काळापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत जवळपास दीडशे वर्षाचा कालखंडातील तूंबाड चा खोतांच्या चार पिढ्याची कथा या कादंबरी मध्ये गुंफली आहे.