एखाद्या साहित्यिकाच्या अगणित साहित्यातून निवडक असे साहित्य बाजूला काढून त्याचा एक संग्रह उभा करणे हे काम चांगले वाटले तरी असते बिकटच. त्यातून कथा वा काव्य अशा एकाच प्रकारातून ही निवड करायची असेल तर काम थोडे हलके होते. पण साहित्याच्या सतरा प्रकारांतून या ना त्या प्रकारे लक्षणीय तेवढेच निवडून काढायचे म्हणजे शंभर प्रकारांतून मोजक्या खाद्यपदार्थांनी भरलेले ताट पुढ्यात ठेवण्याइतके अवघड असते. मूळ लेखकाला सुद्धा हे काम अवघड जागच्या दुखण्यासारखे होऊन बसते. कारण ‘निवडक’ या शब्दात निवड करणाऱ्या महाभागाची ‘आवड’ प्रमाण मानावी लागते. अनेकदा ही आवड म्हणजेच निवड ‘शेळी जाते जिवानिशी- खाणारा म्हणतो वातड’ असे म्हणण्याची पाळी मूळ लेखकावर आणते.