तंतू विस्तार जीव जोवर गर्भरूपात मातेच्या तनु-पालखीत पहुडलेला असतो, तोवर तो एकटा नसतो. जन्माला आला आणि नाळ कापली गेली, की शारीरिकदृष्ट्या तो अगदी एकटा पडतो. यमाला साकडं घालून अगर सवाल करून सावित्री सत्यवानाला पुनर्जन्म देऊ शकते; पण त्याचे नैसर्गिक विधी स्वतः करू शकत नाही. नाळ तुटली, की दैहिक भोग ज्याचे त्यालाच भोगावे लागतात. आईपासून नवजात अर्भकावस्थेत मी जेव्हा वेगळा व एकटा झालो, तेव्हाचं आता काही आठवणं अशक्य आहे; पण बारा-तेरा वर्षांचा असतानाच मला माझी आई कळली. आकाशात दूरवर घारीच्या आकाराचा घरघर करणारा पक्षी म्हणजे विमान, हे जसं कळतं, तशीच त्या बालवयात मला ताई समजली असावी; पण लगेच मी लट्टू झालो तिच्यावर. ताई माझ्या आयुष्यातली पहिली हिरॉइन.