“धार्मिक विधी व संस्कार यांचा ऊहापोह ज्यात आहे, ते सहावं अंग म्हणजे ‘कल्प’ . या अंगात अकल्पित अवडंबरं केव्हाही घुसू शकतात! शहाण्यानं सदैव त्यांच्यापासून सावधच असलं पाहिजे. अशा माजलेल्या अवडंबरांच्याच पुढे अंधश्रद्धा व्हायला समय लागत नाही! अशा अंधश्रद्धांना कठोरपणं, पुरुषार्थानं निखंदतो, तो युगपुरुष, योगयोगेश्वर सिद्ध होतो. ‘अव’ म्हणजे खाली. तारण्यासाठी खाली येतो तो अवतार! भोवतीच्या असंख्य अंधश्रद्धाधारकांना तारण्यासाठी खाली उतरतो, तो अवतारी युगपुरुष ठरतो. युगंधर सिद्ध होतो!” आचार्य अंमळ थांबलेच. एकटक माझ्याकडेच रोखून बघत म्हणाले, “काय श्रीकृष्णाऽ समजलं काय ?”